बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...
गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...
शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्रियेचा भाग म्हणून आई-वडील व अनिकेत या सर्वांच्याच साधारण तीन ते चार मुलाखतीमधून जे "वास्तव" बाहेर आलं ते मन हेलावून टाकणार होतं...
मुळातच अनिकेत हा चंचल वृत्तीचा (hyperactive) असल्यामुळे कुठल्याही गोष्टी सातत्य ठेवण त्याला जमलेच नाही...अनिकेतची मोठी बहीण त्यामानाने आई-वडिलांसाठी "आदर्शचा मापदंडच" होती...आपल्या मुलाने सुद्धा आपल्या मोठ्या बहिणी प्रमाणेच शैक्षणिक व इतर वर्तणूक स्वीकारावी असे विशेषता अनिकेच्या बाबांचे ठाम मत होते... अनिकेतच्या वडिलांचे उत्पन्न जेमतेम असल्यामुळे आपल्या कुटुंबाचा खर्च व देखभाल करताना ते कमालीचे तणावपूर्ण झाले होते...तो तणाव त्यांना हल्ली सहन होत नव्हता...
अनिकेच्या वडिलांचे बालपण अतिशय कमालीच्या शिस्तीत झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी अनिकेच्या वडिलांना अतिशय रुक्ष पद्धतीने वागवले होते...आपल्या बालपणी प्रेमाचा अभाव, कमालीची शिस्त, वडिलांची रुक्ष वागणूक व अभ्यासात हुशार नसल्यामुळे आपल्या वडिलांचा खूप शारीरिक मार अनिकेच्या वडिलांनी सहन केला होता....बालपणीच्या या सर्व कटू आठवणींचा संग्रह त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक बनला होता... पुढे पालक होताना त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातील लपून किंवा दबलेल्या व्यक्तिमत्त्वाने (suppressed personality) अनिकेतच्या वागण्यामुळे व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाढत्या ताणतणामुळे एक मानसशास्त्रीय दोषपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण झाले होते...
व त्यातूनच अनिकेतला सतत शिव्या देणे, लावून दिलेली शिस्त मोडल्यास अमानुषपणे मारहाण करणे, कोंडून ठेवणे, जेवण न देणे, सतत टाकून बोलणे, घरात दुय्यमपनाची वागणूक देणे अशा विविध प्रकारातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे व वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या ताण-तणावाचे "फ्रस्ट्रेशन" त्यांनी अनिकेतवर करायला सुरुवात केली होती... बाबाच्या या वागणुकीमुळे अनिकेच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये कमालीचे बदल घडत गेले होते... अनिकेची आई हे सर्व थांबवण्यासाठी प्रयत्नशील असूनही बऱ्याच अंशी असमर्थ ठरलेली असल्यामुळे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात चिंतातून (anxious) बनत होती...
अनिकेच्या मुलाखती दरम्यान बऱ्याच प्रयत्न नंतर माझे बाबा मला प्रचंड मारहाण करतात...कमरेच्या बेल्टने मला मारतात....अगोदर मला खूप त्रास व्हायचा... रात्रभर खूप दुखायचं... पण हल्ली मला त्याची सवय झाली आहे... आता मला बाबांनी कितीही मारलं तरी मला फारसं फरक पडत नाही... अशा पद्धतीची अनिकेची प्रतिक्रिया मलाही आतून हेलावणारी होती...
टप्प्याटप्प्याने समुपदेशन प्रक्रिया पुढे जात असली तरी अनिकेच्या व्यक्तिमत्त्वावर या सर्व प्रकारामुळे झालेला दुष्परिणाम पूर्णपणे दूर होण्यास बराच कालावधी लागेल...व तो पूर्णपणे यातून बाहेर येणार की नाही हे आता निश्चितपणे सांगता येणार नाही...
या सर्व लिखाणाचा मूळ उद्देश म्हणजे आजही कित्येक "अनिकेत" आपल्या आई-वडिलांचा शारीरिक, मानसिक व कौटुंबिक दैनंदिन मारझोडीस बळी पडत आहे... आई-वडिलांचे स्वतःचे बालपण व त्यातील कटू अनुभव यांचा योग्य मानसशास्त्रीय स्तरावर निपटारा न होणे, आई-वडिलांचे दोषपूर्ण व्यक्तिमत्व, आई-वडिलांमधील बिघडलेले नातेसंबंध, नोकरी व व्यवसाय मधील ताण तणाव, आई-वडिलांचे व्यसनाधीन असणे अशा अनेक कारणामुळे सतत मारहाण करणारे आई किंवा बाबा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत...
हे दृष्टचक्र येथेच थांबवणारे नसून मारहाण होणारी मुलं जेव्हा भविष्यात "पालकत्व" स्वीकारतील तेव्हा सुद्धा ते याच सदोषपूर्ण पद्धतीने पालकत्व पूर्ण करतील यात काही शंका नाही.. मी अनुभवलेली केस स्टडी फक्त अनिकेत व त्याच्या बाबाच्या संदर्भात नसून मारहाण करणाऱ्या प्रत्येक आई किंवा बाबाचे व पर्यायाने संपूर्ण कुटुंब व समाजाचे मानसशास्त्रीय समुपदेश होणे अत्यंत गरजेचे वाटते...
लेख उपयुक्त वाटल्यास फॉरवर्ड करावे...
डॉ.जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषय अभ्यासक
Mob-9420461580
Very true Dr. Gandhi sir.. What about his father.. Is he ready for counselling?
ReplyDelete