बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा अशी मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.
परंतु गेल्या काही काळापासून पाल्य व पालकत्व याबाबत मानसशास्त्रीयस्तरावर अनेक गंभीर प्रश्न समोर येताना दिसतात आणि त्याची मूळ कारणे शोधणे गरजेची वाटतात. मानसशास्त्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांना एक पालक म्हणून आपण वेळीच पायबंद घालू शकतो आणि त्यासाठी खालील चुका आपण कळायला पाहिजे.
पालक म्हणून आपण खालील चुका टाळू शकतो.
(1) आपल्या मुलांची इतर मुलांसोबत तुलना करणे
(2) मारहाण करणे
(3) शिवीगाळ करणे
(4) शारीरिक दृष्ट्या कष्टदायक काम करायला लावणे
(5) नेहमी अपमान करणे
(6) भावंडांमध्ये भेदभाव करणे
(7) दुय्यम दर्जाची वागणूक देणे
(8) मुलांमध्ये नकारात्मक प्रतिमा तयार करणे
(9) कुटुंबामध्ये पती पत्नी विभक्त होणे किंवा वेगळी विचारसरणी ठेवणे
(10) अतिरिक्त शैक्षणिक अपेक्षा वाढवून ठेवणे
(11) सतत अपयशी असल्याची भावना निर्माण करणे
(12) अति लाड पुरवणे
(13) मुलांना आयुष्यात येणाऱ्या यश व अपयशाला सामोरे जाण्यास तयार न करणे
(14) मुलांना विरंगुळा, मानवी नातेसंबंध, आत्मसमाधान, आत्मविकास, स्वप्रतिमा व मानवी मूल्ये याबाबत सुस्पष्ट कल्पना न देणे
(15) मुलांच्या अपयशाला न स्वीकारणे
(16) मानवी जीवनातील भौतिक प्रगती सोबतच सामाजिक, कौटुंबिक व आध्यात्मिक प्रगतीची जाणीव निर्माण न करणे
(17) मुलांची भावनिक व मानसिक गरजांची पूर्तता न करणे
(18) मुलांना भरपूर व पुरेपूर वेळ न देणे
(19) घरामध्ये नेहमी वादविवाद व संघर्ष ठेवणे
(20) मुलांसमोर व्यसनाधीन राहणे
अशा एक ना अनेक मानसशास्त्रीय चुका पालक करीत असल्यामुळे त्याचे दीर्घकालीन परिणाम त्या संपूर्ण कुटुंबावर व पाल्यावर मोठ्या प्रमाणात पडत असतात. पालक म्हणून मुलांना मोठं करण्यामध्ये आनंद व ताण या दोन्ही भावनांना अनुभवणाऱ्या पालकांनी या मानसशास्त्रीय चुका टाळल्यास त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये मानसशास्त्रीय निरोगीपणाची भर पडेल यात शंका नाही. यामध्ये गरज पडल्यास वेळीच पालकांनी व पाल्याने समुपदेशन घेणे ही काळाची गरज ठरत आहे...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
Comments
Post a Comment