आधुनिक जीवनशैली, स्पर्धा, दैनंदिन ताण-तणाव, विभक्त कुटुंब पद्धती, तणावपूर्ण नातेसंबंध असे एक ना अनेक कारणांमुळे मानसिक आरोग्याची पातळी वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर ढासळत आहे. जागतिक स्तरावर भारताने डिप्रेशन (depression) या मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णसंख्येत अग्रक्रम राखलेल्या आपल्या देशाला त्याचे गांभीर्य नसणे हाच मोठा धोका म्हणावं लागेल. आणि म्हणूनच वैयक्तिक स्तरावर आपल्याला डिप्रेशनच्या संदर्भातील माहिती व त्या संदर्भातील मानसोपचार याची माहिती असणे गरजेचे ठरते.
मुळातच निर्माण झालेले डिप्रेशन हे बायलॉजिकल आहे कि सायकॉलॉजिकल वा एन्व्हायरमेंटल (परिस्थिती सदृश) हे समजणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये डिप्रेशन बाबत जागरूकता अधिक असल्यामुळे रुग्णांना सुरुवातीची लक्षणे जाणवू लागल्यास सर्वप्रथम मानसिक आरोग्य समुपदेशक (mental health counsellor) किंवा सायकोथेरपिस्ट (psychotherapist) यांच्याकडे जाऊन ती मंडळी डिप्रेशन ला मोठ्या प्रमाणात रोखण्यात यशस्वी ठरतात.
डिप्रेशनची सिम्प्टम्स अधिक तीव्र असल्यास उपचार प्रक्रियेमध्ये सर्वात अग्रक्रमाने मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार याचा विचार होणे गरजेचे आहे. उपचारापूर्वी व उपचारादरम्यान डिप्रेशन बाबतीत जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर मिळवणे हे उपचार एवढेच महत्त्वाचे आहेत. डिप्रेशनची वाढती संख्या लक्षात घेता आपण सर्वांनी डिप्रेशन संदर्भातील प्रतिबंधात्मक मानसशास्त्रीय उपचार प्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे.
मानसोपचार संदर्भातील भीती, शंका, अंधविश्वास, सामाजिक कलंक (social stigma) व सामाजिक संकोच हे वेळीच बाजूला करून दूर करावे लागतील. डिप्रेशन ग्रस्त असलेल्या रुग्णांना व कुटुंबांना दिलासा, काळजी व सहकार्य देण्याची भूमिका आपण सर्वांना वठवावी लागेल. लवकरात लवकर डिप्रेशन ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी मानसिक आरोग्य विषय तपासणी शिबिरे आयोजित करावी लागतील.या सर्वांमध्ये आपला सहभाग हेच डिप्रेशनशी लढण्याचे माध्यम असू शकेल....
Comments
Post a Comment