सतत असलेली परिस्थितीबाबत, व्यक्तीबाबत वा घटनेबाबत कुरबुर करत राहणे, तक्रारी करत राहणे ही सवय आपल्या सर्वांचीच नित्यनियमाची होत आहे. आजूबाजूची परिस्थिती किती भयंकर, चुकीची व खडतर असल्याच्या सबबी हे सर्व आपल्या "डिफेन्स मेकॅनिझमची" चलाखी असते. परिस्थिती गंभीर, खडतर व विरोधक असेलही पण व्यक्तिगत पातळीवर ती संघर्ष व सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला सुद्धा खूप मदत करीत असते.आणि म्हणूनच आजूबाजूला असलेली परिस्थिती, व्यक्ती वा घटना आणि त्यानुसार आपली झालेली अधोगती वा प्रगती असे आलेख व मोजमाप तयार करता येणार नाहीत.आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण संशयात्मक, भीतीयुक्त, नैराश्यग्रस्ततेने, व आक्रमकतेने बघतांना आपण त्या परिस्थितीतील अपेक्षित असलेल्या सुधारणेतील "आपला सहभाग" गमावून बसत असतो.
व्यक्तिगत, कौटुंबिक वा संस्थात्मक पातळीवर असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे वा आपल्यामध्ये परिस्थितीनुरूप बदल करत राहणे हे सतत तक्रार व कुरबुर करत राहण्यापेक्षा उत्तम ठरेल.सतत एखाद्या परिस्थिती, घटनेकडे वा व्यक्तीकडे निराशावादी दृष्टिकोनातून बघत राहणे वा तक्रारीचा पाढा वाचत राहणे हे दीर्घकालीन मानसिक समस्यांना आमंत्रण देणेच ठरेल.आणि म्हणूनच... हर वक्त का रोना तो...बेकारका रोना है....ही निदा फाजली यांनी लिहिलेली आणि जगजीत सिंग यांनी गायिलेली गजल एक उदात्त मानसशास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करते.
Comments
Post a Comment