साधारण सहा महिन्यापूर्वी शहरातील मनोविकार तज्ञा कडून राधिकाला (नाव बदललेले आहे) माझ्याकडे समुपदेशनासाठी रेफर करण्यात आले.45 वर्षीय राधिका डिप्रेशन या आजाराशी झगडत होती. राधिकेशी संवाद साधला असताना असे लक्षात आले की तिच्या मानसिक आजारांच्या लक्षणा पेक्षा तिच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, B.Sc पर्यंतचे शिक्षण उत्तम रित्या पूर्ण करून गेल्या बावीस वर्षांपासून दोन मुलांसह आपला संसार सांभाळणारी राधिका गेल्या तीन वर्षापासून डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त होती. डिप्रेशनच्या निदानानंतर नियमित औषधोपचार घेत असली तरीही मात्र तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होत नव्हती. समुपदेशन दरम्यान लक्षात आलेली मानसशास्त्रीय बाब आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल. राधिकेचे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष मुलांचे संगोपन व घरातील व्यवस्थापनात अतिशय व्यग्रतेत निघून गेली.
कालांतराने मुले मोठी होत गेली. शिक्षण व नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थिरावली व रमली सुद्धा. नवऱ्याचा उद्योग वाढल्यामुळे त्याचीही व्यग्रता वाढली. याचाच परिणाम म्हणून सतत व्यग्र,बडबड व कायम बिझी असणारी राधिका एकटी पडायला लागली.कालांतराने तिला एकटेपणाची सवय करून घ्यावी लागली. मुळातच सामाजिक व बाह्यवक्र (extrovert) व्यक्तिमत्व असणाऱ्या राधिकेला एकटेपणाशी मैत्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. सतत बडबड व आनंदी राहणारी राधिका आता गप्प राहायला सुरुवात झाली. हळूहळ, टप्प्याटप्प्याने राधिकेची मानसिक स्थिती ढासळत राहिली व गेल्या तीन वर्षापासून डिप्रेशन आजारासाठी औषधोपचार सुरू झाले. गेल्या सहा महिन्यापासून समुपदेशन अंतर्गत कुटुंब व सर्वांना तिच्या एकटेपणाची कल्पना करून देण्यात आली. हळूहळू कुटुंबाच्या मदतीने व सहभागाने तिचा एकटेपणा कमी करण्यावर एकमत करण्यात आले .
कुटुंबाच्या माध्यमातून व त्यांच्या सहभागातूनच राधिकेच्या एकटेपणावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मात करण्यात आली. हळूहळू राधिका बऱ्याच अंशी सावरत होती. औषधांचा परिणाम अधिकाधिक जाणवत होता. आपले सामाजिक जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्नही ती करत होती. त्याचाच एक भाग म्हणून तिने छोटसं ऑनलाईन मार्केटिंग स्टार्टअप सुद्धा तिने सुरु केला. एकंदरीत पूर्वीची राधिका टप्प्याटप्प्याने परत येत आहे.अजूनही बराच टप्पा गाठायचा असला तरीही राधिका व त्यांचे कुटुंब त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. डिप्रेशन हे जितकं बायलॉजिकल असतं तितकच ते सायकॉलॉजिकल व एन्व्हायरमेंटल पण असू शकतं. मुळातच तिचा मानसशास्त्रीय एकटेपणा (loneliness) हाच तिच्या आजाराचा मूळ पाया होता. आजारापेक्षा आपण एकटे पडत आहोत ही भावना माणसाला मानसिक स्थिरता लाभू देत नाही. असा हा मानसशास्त्रीय एकटेपणा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि म्हणूनच आपल्या मनाचा एकटेपणा हा मानसिक आजार नसला तरीही त्याचे योग्य व्यवस्थापन करणे मानसिक आरोग्य संवर्धनाची पायरीच ठरेल.
Comments
Post a Comment