बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा याची मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.परंतु गेल्या काही काळापासून पाल्य, पालकत्व व एकूणच शिक्षण व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न समोर येताना दिसतात आणि त्याची मुळे शोधणे गरजेचे वाटतात. हल्लीच्या पालकत्वाची संकल्पना पूर्णपणे पाश्चिमात्य देशाच्या विचारसरणीवर आधारित होताना दिसत आहे.
मुलाच्या/ पाल्याच्या जन्माबरोबरच त्याची शाळा, शिक्षणाचे माध्यम, ट्युशन क्लास, स्पोर्ट क्लास, हॉबी क्लास या सर्व बाबतीतची उपलब्धता करून देण्याची व तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची पालकांमध्ये शर्यतच असलेली लक्षात येत आहे.पालक म्हणून आजूबाजूला उपलब्ध असलेले "बेस्ट पॅकेज" देऊन आपण धन्यता मानत असतो.बालपण संपतच नाही की वेगवेगळ्या स्पर्धेचे व करिअरचे भूत आ वासून उभे करायचे व त्यासोबतच मुलाच्या मानगुटीवर ते भूत बनवण्यामध्ये धन्यता मानायची हे सर्वसाधारण चित्र दिसत आहे. करिअरच्या क्षेत्रात स्पर्धा आहे हे मान्य आहे पण करिअर म्हणजे आयुष्य नव्हे हे समजून देणे पालकांना गरजेचे वाटत नाही.आपल्या पाल्याने व्यवसायिक, वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर आनंदि व यशस्वी व्हावे याबाबत पालक खूपसे अग्रही दिसत नाही.आपण ज्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये राहतो त्यापलीकडे सुद्धा एक सुंदर व आश्वासक जग आहे याची अनुभूती करून देण्याची जबाबदारी आपण सर्वांची नाही का? व्यक्तीची प्रगती त्याने गोळा केलेल्या भौतिक वस्तूवरून करता येईल परंतु आंतरिक प्रगतीची अनुभूतीयुक्त शिक्षण व प्रशिक्षण देणे पालकांची जबाबदारी नाही का? बऱ्याचदा असे लक्षात येते की खूप कष्ट करून मोठ्या पदावर जाणारी व्यक्ती भ्रष्टाचार करीत असेल किंवा वैफल्यग्रस्त जीवन जगत असेल तर त्याची मुळे सदोष पालकत्वा मध्ये सापडतील.
मुलांना मोठे करण्याचे कुठलेही सुस्पष्ट असे ठोकताळे नसले तरी पालकत्वचे प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे वाटते.खासकरून बालपणीच्या काळामध्ये आपल्या मुलांना मुक्तपणे बागडू द्या.अभ्यास महत्त्वाचा आहे पण अभ्यास व्यतिरिक्त सुद्धा मुल आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात व पुढे या सर्व गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासासाठी खूप उपयोग करून घेता येतो. करिअरचे अट्टाहास मुलांकडून पूर्ण करून घेण्यात पालकांनी धन्यता मानून घेऊ नये. आपण निर्माण केलेल्या वाटेवरच आपल्या मुलांनी चलावे हे गरजेचे नाही . प्रत्येक मुल हे आपल्या पद्धतीने स्पेशल असतं.व्यक्तिमत्वाला वळण लावणे, प्रोत्साहन देणे , आयुष्याप्रति सकारात्मकता निर्माण करणे, येणाऱ्या काळाची पावले ओळखून वेळीच त्याला सावध व प्रशिक्षित करत राहणे हे पालक म्हणून महत्त्वाचे ठरेल परंतु त्याने पालकाच्याच मार्गावर चालावे याबाबत अट्टाहास नसावा.
एखादी गाडी चालवायची असल्यास आपल्याला त्याचे लायसन्स व प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. पालकत्वाची भूमिका स्वीकारताना सुद्धा अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज निर्माण होताना दिसत आहे.आपल्या पाल्याने त्याच्या आयुष्य व करिअरच्या निवडलेल्या वाटेवर त्यांना पुढे जाऊ द्या. यादरम्यान त्यांना सतत प्रोत्साहन व धाडस देणे हेच खरे पालकत्व ठरेल.शैक्षणिक गुणवत्ता आयुष्यात महत्त्वाची असली तरी ती इतर शारीरिक, मानसिक ,सामाजिक बौद्धिक व व्यवसायिक गुणवत्तेपेक्षा वरचढ आहे हा भास कायमचा दूर व्हावा एवढीच एक अपेक्षा.
So nice
ReplyDelete